Sunday, December 21, 2014



भाजपमधील ब्राम्हण-ब्राम्हणेतर संघर्ष व मोदीसंकट!
--- प्रा. श्रावण  देवरे,   नाशिक,
मोबा- 94 22 78 85 46
                                                                                                       ईमेल- s.deore2012@gmail.com
The parivar’s ‘punishment’ Modi baiters are waiting for’ हा दिनांक जून 25, 2013 च्या Times of India मधील लेख ज्याने समजून घेतला असेल त्याला भाजपमध्ये सुरु असलेला उघडा-नागडा ब्राम्हण-ब्राम्हणेतर संघर्ष कीती तीव्र आहे, याची कल्पना येईल. 80 च्या दशकापर्यंत भाजपा हा वाण्या-बामणांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा. नंतर त्याची समस्त हिंदूंचा आक्रमक पक्ष म्हणून ओळख निर्माण झाली. आज या पक्षात हिंदू धर्माच्या पडद्याआड एकीकडून ब्राम्हणेतरांचा पक्ष म्हणून तर दुसरीकडून ब्राम्हणी वर्चस्वाचाच पक्ष राहील अशा मुलभूत भुमिका घेऊन उभा संघर्ष पेटलेला दिसतो आहे. या दोन्ही भुमिका मुलभूत असण्याचे कारण हे की त्यांच्या मुळाशी जातसंघर्ष आहे. वर्गसंघर्ष धर्माच्या पडद्याआड लपविला जातो. कारण वर्गीय शोषणाची मुल्ये धर्माच्या नावाने अधिकृत केली जातात. भारतातही जातीव्यवस्थेची मुल्ये धर्माच्या नावाने अधिकृत करण्यात आल्याने जातीय शोषण धर्माच्या नावाने बिनदिक्कत चालते.
जातीव्यवस्थेवरची धर्माची ही घट्ट पकड तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने ढिली केल्याने या व्यवस्थेचे नियंते (ब्राह्मणी नियंत्रक) अडचणीत आलेत. तसेच ब्रिटिशांच्या उपस्थितीनेही त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली. जातीव्यवस्थेचे नियंत्रक मुख्यतः ब्राम्हण बुद्धिजीवी- यांच्यासमोर त्याकाळी दोन मुख्य प्रश्न उभे राहीले होते. पहिला महत्वाचा प्रश्न हा होता की, जातीव्यवस्था आहे तशीच टिकवून ठेवणे. आणि दुसरा तेवढाच महत्वाचा- ब्राम्हण जातीचे वर्चस्व टिकविणे. बदलत्या काळात वरवर जुडवून घेऊन वर्ण-जात व्यवस्थेचा गाभा कायम ठेवण्यात, किंबहुना तो अधिक घट्ट व टणक करण्यात ब्राम्हण बुद्धिजीवी वर्ग नेहमीच यशस्वी होत आला आहे. हा दांडगा ऐतिहासिक अनुभव गाठीशी असल्याने ते याही आधुनिक काळात डगमगले नाहीत. सत्यशोधकांचे जातीअंताचे आक्रमण परतवून लावने/थोपवून धरणे वा पचवणे आणि ब्रिटिशप्रणित नव्या येऊ घातलेल्या वर्गव्यवस्थेशी जुळवून घेणे ही दोन्ही आवाहने त्यांनी लिलया पेलली. त्यासाठी न्यायमुर्ती रानडेंसारखे फुलेमित्र, राजवाडेंसारखे इतिहासकार, टिळकांसारखे मुत्सद्दी, चिपळूणकरांसारखे आक्रमक, सावरकरांसारखे प्रबोधक-विचारक व हेडगेवारांसारखे संघटक आदींच्या नेतृत्वाखाली समस्त ब्राम्हणबुद्धिजीवी वर्ग कसा जोमाने कामाला लागला होता, हे त्या काळाच्या धामधुमीवरून सहज लक्षात येते. आज आपल्या लेखाचा विषय वेगळा असला तरी त्याची ही छोटीशी पार्श्वभुमी ओझरती नजरेखालून घालून आपण पुढे जाऊ या!
अर्थात उपरोक्त पार्श्वभुमी सांगण्याचा उद्देश हा की, आज पुन्हा एकदा जातीव्यवस्थेचे नियंते प्रचंड अडचणीत आलेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणित वर्ण-जात-वर्गअंतक (पहिली) राज्यघटना, दुसर्‍या राज्यघटनेतील आरक्षणासारख्या जातविरोधी तरतुदी, कालेलकर आयोग, कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा राष्ट्रव्यापी भुमीहिनांचा लढा या सर्व जातीयुद्धातील चकमकी पचविण्यात त्यांना सहज यश आले. त्या मानाने मंडल आयोगाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्यात ते पुर्णपणे यशस्वी झाले नाहीतच, उलट अर्धवट लागू झालेल्या मंडल आयोगाने भारतीय समाजकारण-राजकारणाची दिशाच बदलवून टाकली. अर्थात ओबीसींमधल्या वाढत्या सामाजिक जनजागृतीने व त्यातून निर्माण झालेल्या त्यांच्या वाढत्या राजकीय महत्वाकांक्षेने जातनियंते (ब्राह्मणी नियंत्रक) प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत. या पार्श्वभुमीवर मोदी-उदय म्हणजे त्यांचे बॅकफुटवर जाणे आहे की पुन्हा आक्रमक होण्यासाठी दोन पाउले माघार घेणे आहे, याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे.
टाईम्स मधील उपरोक्त लेखात या संघर्षाचे प्रातिनिधिक नेतृत्व ब्राह्मणी छावणीकडून आर.एस.एस. चे संजय जोशी व ब्राह्मणेतर छावणीकडून मोदी-अडवाणी करत असल्याचे सूचीत केलेले आहे. कदाचित लेखक भरत देसाई हे आर.एस.एस. शी अधिक परिचित नसावेत, त्यामूळे या संघर्षाकडे ते व्यक्तीगत स्वरूपात पहात असतील तर तो त्यांचा दोष नाही. मात्र हा लेख लिहीत असतांना मध्येच साधना अंक हाती पडला. 27 जुलै 2013 च्या अंकात कव्हर-स्टोरी असलेला सुरेश द्वादशीवार यांचा लेख वाचला. द्वादशीवार यांनी हा संघर्ष संघटनात्मक पातळीवरचा असल्याचे स्पष्ट केले आहे. ते संघाच्या अधिक जवळचे असल्याने आतल्या गोटातील घडामोडी त्यांना अधिक स्पष्ट दिसत असाव्यात. परंतू ते वैचारिकदृष्ट्याही आर.एस.एस.च्या तेवढेच जवळचे असल्याने त्यांनी या संघर्षातील वैचारिक व सामाजिक पार्श्वभुमी मांडण्याचे टाळलेले आहे. मोदी प्रकरण केवळ देशालाच नव्हे तर खुद्द संघालाही कसे धोकादायक वाटते, हे पटवून देण्यात त्यांनी संपूर्ण लेख खर्ची पाडलेला आहे. त्यांच्या लेखाची सुरूवातच पुढील वाक्याने होते ---
‘‘नरेंद्र मोदी हे संघासाठी धरता न येणारे आणि सोडताही न येणारे प्रकरण आहे. -----’’ (पान 10) हे जर सत्य आहे तर कोण्याही सुज्ञ माणसाला जो प्रश्न पडतो तो द्वादशीवारांनाही पडला व तो त्यांनी (सडेतोडपणे?) संघाला न विचारता संघाच्या बाहेरच्या लोकांना विचारला आहे. ----
‘‘--- एक प्रश्न संघाबाहेरच्यांसाठी---- जो नेता संघालाच डोईजड वाटतो, तो देशाच्या डोक्यावर बसविण्याचा त्याचा हा घाट कशासाठी?’’ (पान 11)
या प्रश्नाच्या उत्तरासाठी ते चेहरे आणि मुखवटे ही गोविंदाचार्यांची भाषा वापरतात. परंतू उत्तर मिळण्याऐवजी विसंगतींनी भरलेला गोंधळच वाचकांच्या वाट्याला येतो. संघाने अडवाणींचा (संघीय) चेहरा लपविला व वाजपेयींचा (तथाकथित सेक्युलर) मुखवटा पुढे करून सत्ता प्राप्त केली, असे द्वादशीवार म्हणतात. वाजपेयींचे वयोमान पाहता पुढच्या पंचवार्षिकपर्यंत त्यांचे राजकीय अवतारकार्य संपेल तेव्हा आता आपलाच नंबर निश्चित समजून अडवाणी कामाला लागले. त्यांनी उपप्रधानमंत्रीपद मिळवून आपल्या वारसा हक्कावर शिक्कामोर्तबही करून घेतले. अर्थात हे शिक्कमोर्तब संघाच्या अनुमतीशिवाय होणे शक्य नव्हते. अडवाणींना तेव्हा वाटले की संघाचे शिक्कामोर्तब तर झाले, आता आपण आपला खरा चेहरा झाकला पाहीजे व वाजपेयींसारखा मुखवटा धारण केला पाहीजे. कारण प्रधानमंत्री होण्यासाठी केवळ संघीय मान्यता पुरेशी नाही, तर एन.डी.ए च्या घटकदलांनाही आपण स्विकारार्ह होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी पुरोगामी मुखवटा धारण करायला सुरूवात केली. पण या घाईगर्दीत ते हे विसरले की संघाचा गाभा हा धार्मिक नसून जातीय आहे. संघाचे वरचे धार्मिक आवरण छेदून आतल्या जातीय गाभ्यापर्यंत जाऊन ते समजून घ्यायचे तर त्यास एकतर वैदिक-ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा किंवा फुले-आंबेडकरी विचारांचा शास्त्रशूद्ध अभ्यासच लागतो. अशा प्रकारचा अभ्यास नसेल तर किमान तेथे पाहीजे जातीचे! परंतू अडवाणींसारख्या ब्राह्मणेतर नेत्याजवळ यापैकी कोणतीही गोष्ट असण्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात त्या त्यांच्याकडे नाहीत हेच त्यांचे क्वालीफिकेशन त्यांना प्रधानमंत्रीपदापर्यंत घेऊन जाणारे होते. परंतू राजकारणाचा सर्वात मोठा दोष हा असतो की, जे मेंदूत नसते तेच नेमके लोकानुनयास्तव घडून जाते. सेक्युलर मुखवटा चढविण्यासाठी त्यांनी केलेले जीनास्तोत्र गायन संघालाही फारसे अडचणीचे नव्हते. वाजपेयींनी त्यापूर्वी असा मुस्लीम-अनुनययाचा लेप अनेकवेळा आपल्या चेहर्‍यावर (मुखवट्यावर) चोपडलेला होता. तरीही ते बिनदिक्कत-बिनविरोध देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले व टिकूनही राहीलेत. मग अडवाणींच्या अश्वमेधाचे घोडे संघाने का अडविले? द्वादशीवार आपल्या लेखात म्हणतात की, अडवाणींची संघनिष्टा वाजपेयींहून कडवी व जबर होती, आणि तरीही संघाने त्यांना अडगाळीत टाकले. द्वादशीवार घटना सांगतात, त्यामागील कार्य-कारण (ध्येय-धोरण) सांगत नाहीत. कारण तोच तर संघाचा खरा चेहरा आहे. इतरांना मुखवटे धारण करायला लावणार्‍या संघाचा चेहरा ब्राह्मण्य-रक्षक असून हिंदुत्व रक्षक हा मुखवटा आहे. हिंदुंत्व रक्षक मुखवट्याच्या आत मुस्लीमद्वेष, हिटलरप्रेम असे आणखी काही जाडजूड लेपही त्यांनी लावलेले आहेत. अडवाणींना अडगळीत टाकण्याचे खरे कारण समजून घेण्यासाठी संघाचे खरे ध्येयधोरण समजून घ्यावे लागते. नव्वदीच्या दशकात मंडलच्या निमित्ताने उभे राहीलेले ओबीसींचे आक्रमण दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू असतांना 1999 साली अडवाणींनी उपप्रधानमंत्री म्हणून ओबीसी जनगननेची घोषणा करणे म्हणजे ओबीसींच्या आक्रमाला रसद पुरवीणे होय! ओबीसींची जातगणना म्हणजे ब्राह्मणी छावणीवर अणुबॉम्बच! अर्थात अडवाणींनी ते जाणीवपुर्वक केले नाही. जातीव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास असता तर त्यांनी आपल्याच छावणीवर अणुबॉम्ब टाकला नसता. त्याकाळी ओबीसी जनगणनेचा मुद्दा मोठ्याप्रमाणात गाजत असल्याने केवळ लोकानुनय करण्याच्या भरात अडवाणींनी ही घोषणा केली आणि मोठ्या कष्टाने मिळणार असलेले हक्काचे प्रधानमंत्रीपद कायमचे गमावून बसलेत. अडवाणींचे संकट निपटून काढण्यात यश आले असतांनाच मोदिचे संकट उभे राहिले.
मोदी प्रकरण जर एवढे घातक आहे, तर ते देशाच्या डोक्यावर बसविण्याचा घाट कशासाठी? हा प्रश्न द्वादशीवार यांनी आपल्यासारख्या संघाबाहेरच्या लोकांना विचारला असल्याने त्याचे उत्तर आपल्याला शोधणे भाग आहे. मोदीचे संकट संघासह देशावरही आहे, तेव्हा संघभक्त संघाची सुरक्षा कशी करायची ते बघतील, देशभक्तांनी आपल्या देशाची चिंता करावी. संघाबाहेरचे बहुतेक सर्वच लोक देशभक्त असल्याने ते देशाची चिंता वाहतील. आम्ही संघवाले मात्र मोदीचे संकट देशावर आणणारच! मोदिचे संकट देशावर लादण्यासाठी संघ-भाजप किती जीवतोडून कामाला लागले आहेत, हे दाखविण्यासाठी देशाचा सर्व मिडीयाही कामाला लागलेला आहे.
चुकीचा प्रश्न विचारला की, वरीलप्रमाणे चुकीचे उत्तर येणारच! प्रश्न बरोबर विचारला की उत्तर बरोबर येणार. मोदीच्यासंदर्भात प्रश्न असा विचारला पाहीजे की, मोदिचे संकट देशावर आहे की संघावर? जर देशावर असेल तर दुसरा प्रश्न -  एका राज्याचा मुख्यमंत्री देशासाठी घातक ठरू शकतो काय? विशेषकरून हा प्रश्न अशावेळी उभा राहीला आहे की, जेव्हा मदर ऑर्गनायझेशन-संघ हा पुर्णपणे व फादर ऑर्गनायझेशन-भाजप हा बराचसा, हे दोन्हीही मोदीविरोधी बनलेले आहेत. स्वतःचे असे कोणतेही विश्वासू नेटवर्क आपल्या हाती नसतांना मोदी देशाला संकटात टाकू शकतात काय? लोकशाहीप्रक्रीयेतून पुढे येऊन हिटलरने देशासकट जगालाही संकटात टाकले, पण त्यासाठी त्याचे देशात व जगभरात भक्कम नेटवर्क होते. आणी हे नेटवर्क वर्गीय हितसंबंधांवर व विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या आधाराने उभे होते. मोदींकडे स्वतःचे असे कोणतेही नेटवर्क नाही व वेगळी विचारसरणीही नाही. त्यामुळे वेगळे कोणतेही हितसंबंधही नाहीत. जे आहे ते सर्व संघाचेच आहे. देशाला संकटात टाकण्यासाठी कींवा देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी नेटवर्क, विचारसरणी व हितसंबंध या अत्यंत मजबूत अशा तीन स्तंभांवर उभे असलेले भक्कम संघटन असावे लागते. अशाप्रकारचे संघटन आज केवळ संघाचेच आहे. आणी संघ तर देशावर मोदीचे संकट लादायला उतावीळ झाला आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की, मोदीचे संकट देशावर नाहीच, ते संघावरच आहे. त्याहूनही अधिक खोलात गेले तर कळते की, संघावर आलेल्या संकटाचा मोदी फक्त मुखवटा आहेत, त्या संकटाचा चेहरा वेगळाच आहे. मागील परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ब्राह्मणी छावणीने जातीव्यवस्थेविरूध्दची सर्व आक्रमणे व चकमकी एकतर परतावून लावलीत, पचवलीत कींवा दडपून टाकलीत. परंतू मंडल आयोगाच्या निमित्ताने ओबीसींच्या ज्या आक्रमणाला आज ते तोंड देत आहेत, त्याने त्यांच्या तोंडाला फेस आणलेला आहे. देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ओबीसीकडे सरकतो आहे, म्हणजे जातीयुद्धाला निर्णायकपणे तोंड फुटले आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओबीसी जातगणनेचे आक्रमण त्यांनी कॉंग्रेसमधील प्रणव मुखर्जी नावाच्या संघ-सरदाराकडून परतावून लावले. परंतू तरीही ओबीसींचे आक्रमण राजधानीच्या दिशेने दिवसागणिक एवढे तेज होत आहे की ते आता पधानमंत्रीपद बळकवणारच अशी संघाची पक्की खात्री झाली आहे. ही खात्री पक्की झाल्यावरच त्यांनी या संकटाला तोंड देण्यासाठी संकटालाच मोदीचा मुखवटा लावून देशासमोर उभे केले आहे. अमेरिकेच्या टाईम मॅगेझीनने मोदीचा चेहरा पहिल्या पानावर छापून ते फक्त सूचित केले होते. त्यातून संघाला काय धडा घ्यायचा तो त्यांनी घेतला आणि मोदीसंकटाला मोदीचाच मुखवटा लावून ते लढायला सज्जही झालेत.
आता असा प्रश्न उपस्थित होतो की, मोदिसंकटाचा मुखवटा जर मोदी असेल तर, (खरा) चेहरा कोण आहे? मोदीसंकटाचे चेहरे आहेत, नितिश, मुलायम आणि लालू! नितिशकुमार हे आपले प्रधानमंत्रीपद आधी एनडीएमध्ये शोधत होते. परंतू संघाच्या दबावाखाली एनडीएने मोदीचे प्यादे पुढे सरकवल्याने नितिश कुमार आता ते पद तिसर्‍या आघाडीत शोधतील. बोधगयामहाविहार बॉम्बस्फोट आणि अन्नविषबाधा अशा षडयंत्रांद्वारे नितिश कुमारांना नियंत्रित करण्याचा संघाचा प्रयत्न केविलवाणा असला तरी दुसरे पर्यायच त्यांच्याकडे शिल्लक राहीलेले नाहीत. या युद्धात मोदीसंकटाचा चेहरा असलेले नितिशकुमार जसेजसे आगेकुछ करतील तसे तसे त्यांना संघप्रणित वाढत्या चकमकींना तोंड द्यावे लागणार आहे.
याचा अर्थ संघ खरोखर मोदींना प्रधानमंत्री पदावर बसवायला निघाले आहेत, असा कोणीही अर्थ काढू नये. देशाच्या सर्वोच्च पदावर ओबीसी व्यक्ती बसणे म्हणजे बाह्मणी छावणीच्या उध्वस्तीकरणाची सुरूवात होय! एक नॉनब्राह्मीण (क्षत्रिय) व्ही.पी. सिंग अकरा महिने प्रधानमत्री राहिलेत. त्यांनी ब्राह्मणी छावणीवर टाकलेल्या मंडलबॉम्बचे हादरे आजही संघाला भयभीत करीत आहेत. जर ओबीसी प्रधानमंत्री झाला तर आपलं काय होईल याची पूर्ण कल्पना संघाला आहे. त्यामूळे मोदी प्रधानमंत्री बनणे केवळ अशक्य आहे. अडवाणींना अडवण्यासाठी वाजपेयी अटल होते, आता मोदींना ऐनवेळी हटविण्यासाठी मुरलीमनोहर जोशींचे उपरणे झटकले जाईल. परंतू  मोदींना हटविण्याची वेळ येणारच नाही, अशी व्यवस्था संघ करतो आहे. भाजपने निवडणूक जिंकावी व भाजपाचाच प्रधानमंत्री व्हावा, हे संघाचे धोरण कधीच नव्हते आताही नाही. भाजपासकट इतर कोणत्याही पक्षातून  नॉनब्राह्मीण (मुख्यतः ओबीसी) प्रधानमंत्री होऊ द्यायचा नाही, हे खरे संघाचे धोरण आहे. कारण जातीव्यवस्था ही केवळ ओबीसींमुळेच टिकून आहे आणि ती नष्ट करण्याची ऐतिहासिक जबाबदारी ओबीसीच पार पाडणार आहे. भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू ओबीसीकडे सरकतो आहे, याचा अर्थ ओबीसी आता हे क्रांतीकार्य करायला सज्ज झाला आहे. आणि ह्यालाच संघ ब्राह्मणी छावणीवरचे महासंकट समजतो. ब्राह्मण धोक्यात आला की तो आवई उठवितो- हिंदू खतरेमे आहे! आता हे आलेले महासंकट ब्राह्मणी छावणीवरच आलेले असल्याने ते या संकटाला मोदी मुखवटा चढवून ते देशावरचे संकट असल्याचे भासवीत आहे.
(ताक.-  हा लेख जूलै 2013 च्या अंतापर्यंत लिहून तयार झाला होता व तो अनेक मासिक-साप्ताहिकांना प्रसिद्धिसाठी पाठविला होता.... मात्र हा लेख छापण्याचे धाडस कोणीही केले नाही... हे धाडस ब.सं. ने केले या बद्दल त्यांचे आभार...! दिड वर्षापुर्वी लिहिलेल्या या लेखात आम्ही जी मध्यवर्ति भुमिका आम्ही मांडली होती, ती आता खरी ठरत आहे.... आज मोदींनी राजीनामा देण्याची धमकी दिली ती केवळ आर.एस.एस.च्या जीवघेण्या षडयंत्राला शह देण्यासाठी..... आर.एस.एस. प्रमुख भागवत यांनी धमकी दिली हे की, ‘मोदी हे ‘अभिमन्यु’ आहेत’ याचा अर्थ अधिक समजून सांगण्याची गरज नाही. आता हा जीवघेणा ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष अंतिम टोकापर्यंत चाललेला आहे, हे मात्र निश्चत....  दिनांक- 21 डिसेंबर 2014)                                                                
                                          --- प्रा. श्रावण  देवरे,  नाशिक, 
  मोबा- 94 22 78 85 46 
    ईमेल- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment